पुणे : खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात १,००० क्युसेक विसर्ग
पुणे, 18 जुलै, (हिं.स.)। खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला ७०० क्युसेक विसर्ग आता १,००० क्युसेक करण्यात आला आहे. दौंड आणि इंदापूर तालुक्यातील गावांच्
Dam


पुणे, 18 जुलै, (हिं.स.)। खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला ७०० क्युसेक विसर्ग आता १,००० क्युसेक करण्यात आला आहे. दौंड आणि इंदापूर तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

सध्या संतांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम इंदापूर तालुक्यात असल्याने वारीसाठी राखीव ठेवलेले पाणीच कालव्यातून सोडले जात आहे. हे पाणी केवळ पिण्याच्या वापरासाठी असून, इंदापूर तालुक्यात ते लवकर पोहोचावे यासाठीच विसर्गात वाढ करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला असतानाच कालव्यातील विसर्ग वाढविण्यात आल्याने पुणे शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत काही नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या खडकवासला प्रकल्पात १६.९० टीएमसी (सुमारे ५८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला वगळता पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली असली, तरी शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत केवळ १२१ दशलक्ष घनफूट इतकाच पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये नव्याने होणारी पाण्याची भर अद्याप मर्यादित असल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande