
सोलापूर, 18 जुलै (हिं.स.)। पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे दर्शनासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला असून, पूर्वी आठ ते दहा तास लागणारे पदस्पर्श दर्शन आता अवघ्या चार ते पाच तासांत होत आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असतानाही दर्शन व्यवस्थेत सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. व्हीआयपी दर्शन बंद केल्याने सर्वसामान्य भाविकांची रांग अधिक वेगाने पुढे सरकत असून, दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरळीत झाली आहे. दर्शनासाठीचा प्रतीक्षा कालावधी जवळपास निम्म्यावर आल्याने भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे हजारो वारकरी आणि भाविकांना कमी वेळेत श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत असून, मंदिर परिसरातील गर्दी व्यवस्थापनालाही याचा सकारात्मक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कोणत्याही परिस्थितीत व्हीआयपी दर्शन दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दर्शनाचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, भोजन, चहा-नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी वाखरी येथील पालखी तळाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या. वाखरी चौकातील जोडरस्त्याच्या दुरुस्तीचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यकारी अभियंता निमकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड