
रत्नागिरी, 18 जुलै (हिं.स.) । गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यात बहादूरशेख ते कुंभार्ली घाटदरम्यान रस्त्याची झालेली दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निषेध म्हणून २० जुलै रोजी ‘भीक मागो’ आंदोलन करून निधीचे गाठोडे गळ्यात बांधत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे वाहतूक सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला.
बहादूरशेख ते कुंभार्ली घाट या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी मोठे खड्डे, कोसळलेली काँक्रीटची गटारे आणि साचणारे पावसाचे पाणी यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाच्या कामांवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या पार्श्वभूमीवर राजू खेतले यांच्यासह पप्पू आंब्रे, गणेश खेडेकर, मिलिंद कदम, राजेंद्र गोंजारी, आबा हटकर, विनोद चिपळूणकर, मंगेश महाडिक, उमेश पवार, सुनील मोडक, चांद शहा, मुस्ताकिन चांद शहा, सुलेमान शेख आणि भाई सुर्वे आदी मनसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारला.
यावेळी अधिकाऱ्यांनी बहादूरशेख ते पिंपळी हा रस्ता पूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे होता, तर पिंपळी ते कुंभार्ली घाट हा मार्ग सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली. सोमवारपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा २० जुलै रोजी शहर आणि ग्रामीण भागातील मनसैनिक ‘भीक मागो’ आंदोलन करून संबंधित विभागाच्या निषेधार्थ निधीचे गाठोडे गळ्यात बांधतील, असा इशारा त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी