रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने हिंदूंना ''एसआयआर'' नोंदणीपासून भरकटवण्याचे षडयंत्र; शेलार यांचा घणाघात
मुंबई, 18 जुलै (हिं.स.)। एका बाजूने रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने हिंदूंना भरकटवायचे आणि दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट वर्गाला एसआयआरमध्ये नोंदणी करण्याची खुली सूट द्यायची. मतदार नोंदणीच्या कामात हिंदूंनी सहभागी होऊ नये यासाठी त्यांना आंदोलनात गुंतव
रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने हिंदूंना ''एसआयआर'' नोंदणीपासून भरकटवण्याचे षडयंत्र; शेलार यांचा घणाघात


मुंबई, 18 जुलै (हिं.स.)। एका बाजूने रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने हिंदूंना भरकटवायचे आणि दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट वर्गाला एसआयआरमध्ये नोंदणी करण्याची खुली सूट द्यायची. मतदार नोंदणीच्या कामात हिंदूंनी सहभागी होऊ नये यासाठी त्यांना आंदोलनात गुंतवायचे असे षडयंत्र असल्याची घणाघाती टीका करत हे आंदोलन हिंदू समाजाच्या व्यथेसाठी नाही तर हिंदू मतांच्या काही राजकीय कथा निर्माण करता येऊ शकतात का यासाठीचे आंदोलन आहे. म्हणून या आंदोलनाला अधिष्ठान नाही. हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असा घणाघात सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

उबाठा गटातर्फे नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ॲड. शेलार म्हणाले, हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालणारे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने पाहिले तर दुसऱ्या बाजूला रामरक्षा आंदोलनाला कुठलाही विरोध न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आपण पाहतो आहोत. हा या दोन सरकारमधला फरक आहे. हनुमान चालीसाला विरोध करणारे आज रामरक्षा पठण करत आहेत. आंदोलनकर्ते काय मागणी करत आहेत, काय मुद्दे मांडतात आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांची मानसिकता काय हे आपण पाहिले पाहिजे. राम मंदिरातील अपहारासंदर्भात हे हिंदूजागृती अभियान असेल तर या मुद्द्यांवर मी एवढेच म्हणेन की या विषयावर हिंदू जनतेपासून उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारपर्यंत सर्वानीच क्रोध, शोक, आणि राग व्यक्त केला आहे. या अपहाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. या अपहारात ज्या व्यक्तींचा सहभाग असू शकतो त्यांच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. प्रथमदर्शनी जे आरोपी आहेत त्यांना अटकही करण्यात आली. या न्यासाशी संबंधित काही व्यक्तींनी राजीनामेही दिले आहेत. राम मंदिर तिजोरीच्या अपहारातून भारतीय समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सरकारने शोक व्यक्त केला नाही तर कारवाई केली. या विषयावर उत्तर प्रदेश सरकारने कोणालाही पाठीशी घातलेले नाही तर सगळ्यावर कारवाई होते आहे, असे शेलार यांनी नमूद केले .

हिंदूंच्या आणि रामभक्तांच्या भावनांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना बरे वाटावे म्हणून उद्धव ठाकरे हे आंदोलन करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून ॲड. शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे हे राममंदिर उभारणी, हिंदूंचा सहभाग आणि राम मंदिराबाबत असलेल्या भावनांची बदनामी होऊ नये असे वाटणाऱ्या नागरिकांसोबत उभे नाहीत तर काही विशेष वर्गाचे लांगुलचालन करत या विशिष्ट वर्गाच्या मतांसाठी ते हे उद्योग करत आहेत, अशा शब्दात श्री. शेलार यांनी उबाठा सेनेच्या भूमिकेचा समाचार घेतला.

हिंदूजागृती आणि राम मंदिर या मुद्द्यावरच आंदोलन होणार असेल तर आंदोलकांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. यात राजकारण आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे. त्यांच्या भूमिकांमध्ये बदल आहे की नाही समजून घेतले पाहिजे. त्यामागील राजकीय अभिनिवेश समजून घेतला पाहिजे आणि हे सारे पाहिल्यावर लक्षात येते की या आंदोलनकर्त्यांना हिंदूजागृती करण्याआधी, रामभक्ती या विषयावर बोलण्याआधी समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणांशी नाक घासावे लागेल. याचे कारण शरयू नदीमध्ये कोठारी बंधूंचा खून केला त्यातील पापी समाजवादी पार्टीसोबत उद्धव ठाकरे तुम्ही आहात. त्यामुळेच हिंदूजागृती, राममंदिर आणि रामरक्षा यावर बोलण्याआधी तुम्हाला हिंदू समाजाचीही माफी मागावी लागेल. ज्या काँग्रेससोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसला आहात त्या काँग्रेसला सडेतोड प्रश्न विचारावा लागेल. रामाचे अस्तित्व नाकारणारे कॉँग्रेसने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र चुकीचे आहे, असे मान्य करावे लागेल अशा शब्दात शेलार यांनी फटकारले.

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी एकत्र यावे की नाही हा त्यांचा व्यक्तिगत आणि पारिवारिक प्रश्न असल्याचे सांगत शेलार यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र विषय रामाचा असल्याने मी एवढेच म्हणेन एका बाजूला उद्धव रामनाम आणि रामरक्षा पठण करताहेत. पण प्रभू रामचंद्रांनी सत्तात्याग करून स्वतःच्या भावाला सत्ता दिली होती. या ठिकाणी दोन भावांचा संदर्भ घ्यायचा झाला तर प्रभू रामचंद्राचा आदर्श बाळगून पक्षांतर्गत सत्तेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलेली वर्तणूक मी सांगण्याची आवश्यकता नाही. स्वतः वनवास घेऊन राज्य करण्यासाठी भावाला विनंती करणे या भावना समजून घ्याव्या लागतील. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या संघटनेचे प्रमुखपद मिळवण्यासाठी काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे आणि त्यामुळे त्यांना रामभक्ती, रामराज्य आणि राम मंदिर यावर बोलण्याचा अधिकार आहे का, असा सवाल शेलार यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande