
पुणे, 18 जुलै (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. करडे गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घेरून त्याच्यावर दोन फेऱ्या गोळीबार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान संबंधित तरुणाला आठ जणांनी अडवून त्याच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.मात्र, प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाने जवळील पाण्यात उडी घेतली. अंधाराचा फायदा घेत तो हल्लेखोरांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार, गोळी तरुणाला लागली नसून तो सुखरूप बचावला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु