
सोलापूर, 18 जुलै (हिं.स.)। राज्य शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ तसेच ३० कोटी वृक्ष लागवड मोहिमेला सक्रिय बळ देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १,१५० सहकारी पतसंस्थांमार्फत प्रत्येकी १०० वृक्षांची लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी मंगळवेढा येथे पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमा अंतर्गत जिल्हाभरात १ लाख १५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांना विशेष निवेदन पाठविण्यात आले असून, या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना दिलीप पतंगे म्हणाले की, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि वाढता पर्यावरणीय असंतोल या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक संस्थेने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानामुळे जिल्ह्यात हरित क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड