सोलापूर - महापौरांना निवेदने देऊनही कामे नाहीत; अधिकारी ऐकत नसल्याची नगरसेवकांची खंत
सोलापूर, 18 जुलै (हिं.स.) सोलापूर महापालिकेची निवडणूक होऊन पाच महिने उलटूनही नगरसेवकांना विकासकामांसाठी अपेक्षित निधी वेळेवर मिळाला नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. आता वॉर्डनिहाय निधी मंजूर झाला असला, तरी तो दोन टप्प्यांत मिळणार असल्याने विकासकामांच
smc


सोलापूर, 18 जुलै (हिं.स.) सोलापूर महापालिकेची निवडणूक होऊन पाच महिने उलटूनही नगरसेवकांना विकासकामांसाठी अपेक्षित निधी वेळेवर मिळाला नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. आता वॉर्डनिहाय निधी मंजूर झाला असला, तरी तो दोन टप्प्यांत मिळणार असल्याने विकासकामांच्या प्राधान्यक्रमाबाबत नगरसेवकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच महापौरांना वारंवार निवेदने देऊनही कामे मार्गी लागत नसल्याची आणि अधिकारी दखल घेत नसल्याची खंत सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधील माजी महापौर श्रीकांचन यन्नम, राजेश्री दोडमनी, प्रशांत पल्ली आणि शिवानंद पाटील या नगरसेवकांना वॉर्डनिहाय विकासकामांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये आणि देखभाल-दुरुस्तीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात केवळ २५ लाख रुपये उपलब्ध होणार असून उर्वरित निधी ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे.

दरम्यान, प्रभागातील आवश्यक विकासकामांची यादी मात्र कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे मर्यादित निधीत कोणती कामे प्रथम करावीत, याचे नियोजन करताना नगरसेवकांची कसरत सुरू आहे.सध्या पावसाळ्यामुळे ड्रेनेज तुंबण्याच्या समस्या गंभीर बनल्या असून पंचशील नगर, इंदिरा नगर, शास्त्री नगर (वडार गल्ली परिसर) आणि कुर्बान हुसेन नगर या भागांत सांडपाणी रस्त्यावर आणि घरांसमोर साचत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या भागांतील ड्रेनेजची कामे सर्वप्रथम हाती घेण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे.याशिवाय रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठ्यासाठी नवीन बोअरवेल उभारणे तसेच इतर देखभाल-दुरुस्तीची कामेही प्रस्तावित असून, उर्वरित निधी मिळाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande