
सोलापूर, 18 जुलै (हिं.स.)प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नव्या बसेसचा समावेश करण्यात येत आहे. सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात येत्या सात ते आठ दिवसांत २० नव्या बसेस दाखल होणार असून, सोलापूर विभागाला एकूण ३५ बसेस मिळणार आहेत.या नव्या बसेसमुळे शहर व जिल्ह्यातील विविध मार्गांवर एसटीची सेवा अधिक सक्षम होणार असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात मंगळवेढा, अक्कलकोट आणि सांगोला आगारांना मिळून १५ ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित २० बसेस लवकरच सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात दाखल होणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाने दिली आहे.वाढती प्रवासी संख्या आणि जुन्या बसेसची जीर्ण अवस्था लक्षात घेऊन राज्य शासनाच्या बस खरेदी धोरणानुसार महामंडळाने ३ हजार ३×२ आसनरचनेच्या बसेस, ९ हजार साध्या बसेस आणि २०० मिनी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापक योजनेतून सोलापूर विभागाला ३५ अत्याधुनिक बसेसचा लाभ मिळत आहे. सोलापूर विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी सांगितले की, नव्या बसेसमुळे केवळ प्रवाशांची संख्या वाढणार नाही, तर एसटी सेवेबद्दलचा नागरिकांचा विश्वासही अधिक दृढ होईल. सर्व आगारांना न्याय्य वाटप होईल, याची काळजी घेतली जाणार असून पुढील टप्प्यात आणखी बसेसची मागणीही करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड