
रत्नागिरी, 18 जुलै (हिं.स.) । अष्टलक्ष्मी दर्शन युवा आदान-प्रदान कार्यक्रमाद्वारे तरुणांना उत्तर-पूर्व राज्यांच्या अभ्यास दौऱ्याकरिता अर्ज करण्याची मुदत २० जुलैपर्यंत आहे.
केंद्र सरकारच्या उत्तर क्षेत्र विकास मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या 'अष्टलक्ष्मी दर्शन युवा आदान-प्रदान' (Youth Exchange) कार्यक्रमांतर्गत उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील राज्यांच्या अभ्यास व अनुभव भेटीसाठी जिल्ह्यातील इच्छुक तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
राज्यातून एकूण दोन टप्प्यांत प्रत्येकी १० युवक व १० युवती अशा एकूण २० जणांची या दौऱ्यासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर विभागातून १ युवक व १ युवती अशा २ जणांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशातील युवकांमध्ये भावनिक ऐक्य दृढ करणे, लोकांमधील परस्पर संबंध वाढवणे आणि उत्तर-पूर्व भारतातील सांस्कृतिक समृद्धी व धोरणात्मक महत्त्वाबाबत जनजागृती करणे हा आहे. देशातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील १५ ते २९ वयोगटातील एकूण १,२८० विद्यार्थी उत्तर-पूर्व भारतातील अग्रगण्य विद्यापीठे व संस्थांना १४ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी भेट देतील.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम: सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक अनुभव देण्यासाठी या दौऱ्यात ९ दिवसांच्या विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचाही समावेश आहे.
कार्यक्रमात पहिला टप्पा १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर दरम्यान, तर दुसरा टप्पा १ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीत आयोजित केला जाईल.
१५ ते २९ वर्षे वयोगटातील शक्यतो पदवीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. युवा पुरस्कार विजेते, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारत स्काऊट्स व गाइड्समधील 'रोव्हर्स आणि रेंजर्स' यांना निवडीत प्राधान्य दिले जाईल.
जिल्ह्यातील इच्छुक तरुणांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक माहितीसह खालील पत्त्यावर प्रत्यक्ष सादर करावा किंवा ईमेलद्वारे पाठवावा:
प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, प्लॉट नं. OS-15, बाफना मोटर्सजवळ, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी. ईमेल आयडी : ratnagiridso@gmail.com
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी