आषाढी एकादशीसाठी उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी; १,६०० क्युसेक विसर्ग सुरू
सोलापूर, 18 जुलै, (हिं.स.) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना चंद्रभागा नदीत स्नान करता यावे, यासाठी उजनी धरणातून शनिवारी (१८ जुलै) सकाळी ६ वाजल्यापासून १,६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील
ujani dam news


सोलापूर, 18 जुलै, (हिं.स.) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना चंद्रभागा नदीत स्नान करता यावे, यासाठी उजनी धरणातून शनिवारी (१८ जुलै) सकाळी ६ वाजल्यापासून १,६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने, त्याआधी तीन दिवस चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाणी सोडण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्णयानुसार उजनी धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत उजनी धरणात ९२.६० टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी २८.९४ टीएमसी उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. तसेच दौंड येथून धरणात ३,७८० क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील साठ्यात भर पडत आहे.

दरम्यान, खरीप हंगामातील शेतीसाठीही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणातून मुख्य कालव्यात २०० क्युसेक, तर सीना-माढा बोगद्यातून १४० क्युसेक पाणी सोडले जात असून, त्यामुळे ऊस, मूग, उडीद यांसह विविध खरीप पिकांना सिंचनाचा लाभ होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande