
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून दापोली तालुक्यातील आसूद मोहल्ला येथील २२ वर्षीय तरुणीची १० लाख ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून ते १२ जुलै २०२६ या कालावधीत फिर्यादी तरुणीच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. संशयिताने ऑनलाइन नोकरीची आकर्षक ऑफर देत व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे पुढील प्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानंतर विविध मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या माध्यमातून तरुणीचा विश्वास संपादन करण्यात आला. नोकरीसाठी नोंदणी, प्रक्रिया शुल्क आणि इतर कारणे सांगून संशयितांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये १० लाख ३०० रुपये ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर कोणतीही नोकरी उपलब्ध करून देण्यात आली नाही किंवा रक्कमही परत करण्यात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी संबंधित मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि बँक खात्यांच्या आधारे सायबर तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी