

रायगड, 19 जुलै (हिं.स.) । अलिबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलात रविवारी (दि. १९) 'नगराध्यक्ष चषक' जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेकडो जलतरणपटूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन समारंभाला वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, सभापती अनिल चोपडा, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, पोलीस अधिकारी किशोर साळे, नगरसेविका अश्विनी ठोसर, ॲड. ऋषिकेश माळी, निवेदिता वाघमारे, योजना पाटील, जमाल सय्यद, समीर ठाकूर, संदीप पालकर, महेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, पालक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनानंतर फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या प्रकारांतील विविध वयोगटांच्या शर्यतींना सुरुवात झाली. प्रत्येक स्पर्धेत जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थितांची दाद मिळवली.यावेळी बोलताना प्रशांत नाईक यांनी ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे आणि रायगडमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू घडविणे हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे सांगितले. अलिबागमध्ये आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून भविष्यातही क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अशाच स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार असून, जिल्ह्यात जलतरण संस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)