
बीड, 19 जुलै, (हिं.स.)। बीड जिल्हा रुग्णालयातील खाटांची कमतरता आणि रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन तब्बल २४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले १०० खाटांचे 'माता व बाल रुग्णालय' दि. ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या १० दिवसांतच येथील मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील प्रतीक्षागृहात वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. मात्र हे वॉटर फिल्टर सध्या बंद अवस्थेत असल्याने रुग्ण व नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याची तक्रार होत आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या नव्या रुग्णालयात उद्घाटनानंतर अवघ्या १० दिवसांतच पिण्याच्या पाण्याची सुविधा ठप्प होणे ही गंभीर बाब असून, संपूर्ण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी व्यक्त केली.
उद्घाटनापूर्वी गळती, लिफ्ट बिघाड; आता वॉटर फिल्टरही बंद
या नव्या इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच छताला गळती लागून पीओपी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच लिफ्ट वारंवार बंद पडल्याने रुग्ण आणि नातेवाईक अडकून पडल्याचे प्रकारही समोर आले. काही प्रसंगी रुग्णांना झोळीतून वरच्या मजल्यावर नेण्याची वेळ आली होती. आता वॉटर फिल्टर बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून, रुग्णालयातील मूलभूत सुविधांच्या देखभालीबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
-----------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis