
परभणी, 19 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान येथे भव्य रक्तदान शिबिर, ५०० वृक्षारोपण, श्री ओंकारेश्वर देवस्थान (श्रीक्षेत्र त्रिधारा) कार्यालयाचे उद्घाटन तसेच देवस्थान परिसराची पाहणी असा विविध सामाजिक उपक्रमांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमास पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते श्री ओंकारेश्वर देवस्थान कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर श्री ओंकारेश्वर देवाची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. तसेच देवस्थान परिसराची पाहणी करून विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला तसेच वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. याचबरोबर आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण आणि मानवसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, रक्तदाते आणि वृक्षारोपणात सहभागी झालेल्या नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis