रत्नागिरी : लांजा अपघातप्रकरणी कारचालक व डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । लांजा येथे महामार्गावर इशाऱ्याविना उभ्या डंपरला मोटारीची धडक बसल्याने झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका दोन्ही चालकांवर ठेवला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लां
रत्नागिरी : लांजा अपघातप्रकरणी कारचालक व डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । लांजा येथे महामार्गावर इशाऱ्याविना उभ्या डंपरला मोटारीची धडक बसल्याने झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका दोन्ही चालकांवर ठेवला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे उभ्या असलेल्या डंपरला मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास लांजा रेस्ट हाऊस परिसरातील शांतीनगर येथे हा अपघात झाला. अपघातात गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबईतील नागपाडा येथील कुरेशी कुटुंबातील तिघांसह कारचालकाचा मृत्यू झाला, तर महम्मद अनस इरफान कुरेशी गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत अपघात घडवून आणल्याप्रकरणी मोटारीचा चालक मुस्तफा काफी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महामार्गावर डंपर धोकादायक स्थितीत उभा करून त्याच्या मागील बाजूस टेल लाइट, रेडियम रिफ्लेक्टर, साइड इंडिकेटर किंवा इशारा दर्शविणारी कोणतीही चिन्हे न लावता वाहन उभे करून ठेवल्याचा ठपका ठेवत डंपर चालक महेशकुमार नुन्नुचैद महतो (रा. झारखंड, सध्या पाली) याच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande