
अमरावती, 19 जुलै (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. नाले, उद्याने, परिसराची स्वच्छता, अतिक्रमणाची स्थिती तसेच नागरी सुविधा आदी समस्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले.
पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कुल चौकातून करण्यात आली. आयुक्तांनी येथून पुढे पायी फेरफटका मारत संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. परिसराची पाहणी केली. पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आतील परिसराची पाहणी करून तेथील सांडपाणी व्यवस्थापन व इतर परिस्थितीचा आढावा घेतला. चौधरी चौक रोडवरील ज्या ठिकाणी कचरा साचतो, तो कचरा त्वरित उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले. राजकमल व गांधी चौक परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. त्यानंतर आयुक्तांनी प्रशांत नगर येथील उद्यानाला भेट दिली. उद्यान अधिक चांगले व आकर्षक करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. असेही त्यांनी सांगितले.
पुढे महानगरपालिकेच्या नर्सरीला भेट देऊन तेथील उपलब्ध झाडे, रोपे तसेच वृक्षारोपणाच्या नियोजनाची माहिती जाणून घेतली. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी उपलब्ध रोपांचा योग्य वापर करून नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यात शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला, शिक्षण समिती सभापती प्रीती रेवणे, नगरसेवक मिलिंद बांबल, मनीष बजाज, प्रदीप हिवसे, स्मिता सूर्यवंशी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, उपअभियंता दिनेश हंबर्डे, बाजार परवानाचे मंगेश कडू, स्वास्थ अधीक्षक विजय बुरे, शहर समन्वयक श्वेता बोके, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक श्रीकांत डवरे, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
नेहरु मैदानाची स्थिती भयावह प्रसिद्ध नेहरू मैदानाचीही आयुक्तांनी पाहणी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आढळला. परिसरात घुमंतूही आढळून आले. त्यामुळे ते प्रचंड नाराज झाले. कचरा हटविण्याच्या सूचना दिल्या. घुमंतूंवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. परिसरात शिस्त व स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी