
लातूर, 19 जुलै, (हिं.स.) : उदगीर येथील नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे सुरू असलेल्या बांधकामाची माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी तसेच कंत्राटदार यांच्याशी चर्चा करुन बसस्थानकाचे काम उच्च दर्जाचे, वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या.
पाहणीदरम्यान आ. संजय बनसोडे यांनी बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम, प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, परिसर सुशोभीकरण तसेच सुरक्षिततेच्या उपाय योजनांची माहिती घेतली. कामामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आ.संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक दररोज या बसस्थानकाचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचा योग्य वापर करून दर्जेदार काम करावे आणि कोणत्याही कारणास्तव कामात विलंब होऊ देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
तसेच, बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण ठेवावे, नियमित पाहणी करून त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि नागरिकांच्या अपेक्षेनुसार आदर्श बसस्थानक उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी ज्ञानेश्वर बिरादार,रामराव राठोड, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, गटनेते अनिल मुदाळे, आगार प्रमुख अजय गायकवाड, नगरसेवक व्यंकट बोईनवाड, शिवकुमार कांबळे, धिरज कसबे, यमुनाजी भुजबळे,सर्जेराव भांगे, महेश बिरादार, शफी हाशमी, अरविंद गिलचे, विक्की भोसले, प्रकाश बिरादार, संदिप बिरादार, कमलाकर फुले, अभिजीत साकोळकर, रत्नाकर बिरादार,बाळु सगर, उर्मिला वाघमारे, वर्षा बनसोडे, ज्योती बानापुरे, शक्ती बलांडे, बाबासाहेब सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकारी व कंत्राटदारांनी काम नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत बसस्थानक लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis