
अमरावती, 19 जुलै (हिं.स.) | चिखलदरा तालुक्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीन पिकावर उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी नव्या संकटाचा सामना करीत आहेत. आधीच कमी पावसामुळे पिकांची वाढ मंदावली असताना आता उंटअळी पानांवर ताव मारत असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, सुरवातीला पावसाअभावी पेरणीनंतर उगवण व वाढ प्रभावित झाली. त्यानंतर झालेल्या पावसामुळे पिके सावरू लागली असतानाच उंटअळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अळी कोवळी पाने कुरतडत असल्याने प्रकाश संश्लेषणावर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तातडीने बाधित शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, तसेच आवश्यकतेनुसार शिफारशीनुसार औषध फवारणीबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कृषी विभागाने उपाय सुचवावे आधीच सोयाबीनची महागडी बियाणे आणून पेरणी केली. अशातच आठ ते दहा दिवसांपासून पाण्याने दडी दिली आहे. त्यातही उंटअळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने पाने खाण्यास सुरवात झाली आहे. त्यावर कृषी विभागाने उपाय सुचवावे, अशी मागणी जामली आर येथील शेतकरी प्यारेलाल दहीकर, गणपत दलाले, उमराव खडके यांनी केली आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी