
बीड, 19 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यामध्ये यंदा खरीप हंगामातील पेरण्यांनी कमालीचा वेग घेतला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ७०.४ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला प्रचंड पसंती दिली असून, सोयाबीनने आपले सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. जिल्ह्यात सोयाबीनची १०० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. दुसरीकडे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार कापूस लागवडीची मुदत आता संपली असून, सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे आता केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शेतकरी येत्या ३१ जुलैपर्यंत सोयाबीनची लागवड करू शकतात, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
१४ जुलै २०२६ च्या पीक पेरणी अहवालानुसार, बीड जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ८ हजार ९४५ हेक्टर इतके निश्चित करण्यात आले आहे. यापैकी ५ लाख ६९ हजार ७२४ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २ हजार ६५२ हेक्टर असताना प्रत्यक्ष तब्बल ३ लाख ३ हजार २७४ हेक्टरवर म्हणजेच १००.२ टक्के पेरणी झाली आहे. त्यामानाने कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २३ हजार ८८९ हेक्टर असून त्यापैकी १ लाख ९८ हजार ५७२ हेक्टरवर म्हणजेच ६१.३ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. उर्वरित पिकांमध्ये भुईमूग, तीळ, कारळा आणि सूर्यफूल यांची पेरणी अत्यंत अल्प प्रमाणात झाली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस हे जास्त कालावधीचे पीक असल्याने त्याची उशिरा पेरणी केल्यास पिकासाठी पोषक वातावरण राहत नाही. तसेच याचा विपरित परिणाम रब्बी हंगामातील पिकांवरही होतो. त्यामुळे आता कापूस पेरणीचा कालावधी पूर्णपणे संपला आहे. शेतकऱ्यांनी आता ३१ जुलैपर्यंत सोयाबीनची लागवड करावी, मात्र उर्वरित दिवसांत पेरणी करताना कमी कालावधीत येणाऱ्या वाणांचीच निवड करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. १६ ते ३१ जुलै या काळात एरंडी-धने, एरंडी-तूर, सोयाबीन, बाजरी-तूर, एरंडी आणि तीळ या पिकांची लागवड करता येऊ शकते, तर कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमुगाची लागवड आता पूर्णपणे टाळावी. याशिवाय १ ते १५ ऑगस्ट दरम्यान संकरित बाजरी, रागी, सूर्यफूल, तूर किंवा तूर-एरंडी या आंतरपिकांची निवड करता येईल.
तालुकानिहाय पेरणीचा विचार केल्यास धारूर तालुक्यात सर्वाधिक ९५.७ टक्के पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ केज तालुक्यात ९५.५ टक्के आणि वडवणी तालुक्यात ९२.४ टक्के पेरणी झाली असून या तिन्ही तालुक्यांनी ९० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. याउलट परळी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अवघी २६.३ टक्के पेरणी झाली असून आष्टी तालुक्यात ४१.३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये माजलगाव येथे ६१.१ टक्के, पाटोदा ६५.६ टक्के, शिरूर कासार ७०.४ टक्के, अंबाजोगाई ७४.९ टक्के, बीड ७९.६ टक्के आणि गेवराई तालुक्यात ८०.८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis