
अमरावती, 19 जुलै (हिं.स.) | एसटी महामंडळाकडून १३.५६ टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली असून आधीच वाहतुकीच्या साधनांअभावी त्रस्त झालेल्या प्रवाशांचे चांगलेच बेहाल होणार आहेत. ही दरवाढ काल मध्यरात्रीपासून लागू झाली असून अमरावती ते पंढरपूरला जाणाऱ्या ‘वारी स्पेशल’ बसेसनाही ही भाडेवाढ लागू असणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये काहीशी नाराजी आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीच्या भाड्यात जवळपास १४ टक्क्याची वाढ जाहीर करण्यात आली आहे. पर्यायाने राज्यासह अमरावती जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा याचा भुर्दंड बसणार आहे. २० जुलैपासून ‘अमरावती ते पंढरपूर’ विशेष बसेस सुरू होत असून दरवाढीचा फटका या बसेसलाही बसणार आहे, मात्र आरक्षणाला ही दरवाढ लागू असणार नाही. जिल्ह्यांतर्गत प्रवासभाडे वाढल्याने प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. अमरावती विभागातील आठ आगारनिहाय ही दरवाढ राहणार आहे. विशेष म्हणजे, अमरावतीवरून नागपूर, यवतमाळ तसेच अकोलाकरिता जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असून अमरावती-नागपूर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भाडेवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
एसटी महामंडळाचे प्रभारी विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी सांगितले की,एसटी महामंडळाकडून भाडेवाढीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र यापूर्वीच प्रवासाचे आरक्षण करणाऱ्यांसाठी ही दरवाढ लागू राहणार नाही.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी