मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीविरुद्ध गुन्हा
रायगड, 19 जुलै (हिं.स.): पेण तालुक्यातील राजमाची (ठाकूरआळी) येथे विवाहित महिलेने कथित मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पेण पोलीस
Married woman commits suicide due to mental and physical harassment; case registered against husband.


रायगड, 19 जुलै (हिं.स.): पेण तालुक्यातील राजमाची (ठाकूरआळी) येथे विवाहित महिलेने कथित मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पेण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह पनवेल तालुक्यातील पोसरी ठाकूरआळी येथील युवकासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीला काही दिवस तिच्याशी चांगले वर्तन करण्यात आले. मात्र त्यानंतर आरोपी पतीने किरकोळ कारणांवरून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. तू मला आवडत नाहीस, तू मला नको आहेस, तू मेलीस तरी चालेल, अशा अपमानास्पद शब्दांत बोलून तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा शारीरिक छळही करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या सततच्या छळाला कंटाळून संबंधित विवाहितेने १४ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास राजमाची येथील राहत्या घरी, लहान मुलीसह एकटी असताना विषारी औषध प्राशन केले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ व १०८ अंतर्गत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रसाळ करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande