
रायगड, 19 जुलै (हिं.स.)।केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी भारतातील पर्वतीय व वारसास्थळ असलेल्या नेरो गेज रेल्वे मार्गांवर प्रदूषणमुक्त हायड्रोजन (Hydrogen Fuel Cell) प्रणालीवरील रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेत नेरळ–माथेरान हिल रेल्वेसह देशातील एकूण आठ वारसा रेल्वे मार्गांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी डिसेंबर २०२४ पर्यंत नेरळ–माथेरान मार्गावर पहिली हायड्रोजन ट्रेन धावेल, असे सांगण्यात आले होते.
काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला असला, तरी भारतीय रेल्वेने हायड्रोजन तंत्रज्ञानातील काम पूर्णत्वाकडे नेले असून देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आता प्रत्यक्ष सेवेत दाखल झाली आहे. त्यामुळे नेरळ–माथेरानसह इतर वारसा रेल्वे मार्गांवरही पर्यावरणपूरक हायड्रोजन ट्रेन सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या या ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल. या तंत्रज्ञानातून धूर किंवा प्रदूषण न होता मुख्यतः पाण्याची वाफ उत्सर्जित होते. त्यामुळे माथेरानसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळाचे संरक्षण करताना आधुनिक आणि हरित रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. अलीकडेच माथेरान हिल रेल्वेला भारतातील पहिली हायड्रोजनवर धावणारी वारसा रेल्वे बनविण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)