
बीड, 19 जुलै (हिं.स.) : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा नुकताच पार पडलेला बीड जिल्हा दौरा केवळ शासकीय कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता लोकांशी थेट संवाद साधणारा आणि जनतेच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारा ठरला. विकासकामांचा आढावा, शासकीय बैठका, विविध उद्घाटने तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे हा दौरा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला.
या दौऱ्यादरम्यान पंकजाताई मुंडे यांनी गेवराई, बीड, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव आदी भागांना भेटी देत विकासकामांना गती देण्यावर भर दिला. विविध शासकीय विभागांच्या बैठका घेऊन प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विशेष म्हणजे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक तसेच विविध समाजघटकांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या समस्या जाणून घेत त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे अनेक नागरिकांना तत्काळ दिलासा मिळाला.
दौऱ्यात औपचारिक कार्यक्रमांपेक्षा जनसंपर्काला अधिक महत्त्व देण्यात आले. दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकानंतरही पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी वेळ राखून ठेवत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भेटीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून आली.
परळी आणि अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच विविध समस्या घेऊन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते, पाणीपुरवठा, वीज वितरण, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केवळ अर्ज स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
समस्यांवर जागेवरच तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. जनतेला भेटल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही, या भूमिकेतून त्यांनी जनतेशी असलेला थेट संवाद कायम ठेवला.
विविध विकासकामांचे उद्घाटन, शासकीय योजनांचा आढावा आणि स्थानिक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची भूमिका यामुळे पंकजाताई मुंडे यांच्या दौऱ्यात विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्वाची छाप अधिक ठळक झाली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis