रत्नागिरी : कडवई येथे ‘मिशन ग्रीन गोल्ड’ अभियानाचा प्रारंभ
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । कडवई (ता. संगमेश्वर) येथील दी एज्युकेशन सोसायटी आणइ उमलती पृथ्वी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ग्रीन गोल्ड’ अर्थात कडवई बांबू लागवड अभियानाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, बांबू लागवडीचा प्रसार
कडवई येथे ‘मिशन ग्रीन गोल्ड’ अभियानाचा प्रारंभ


रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । कडवई (ता. संगमेश्वर) येथील दी एज्युकेशन सोसायटी आणइ उमलती पृथ्वी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ग्रीन गोल्ड’ अर्थात कडवई बांबू लागवड अभियानाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, बांबू लागवडीचा प्रसार आणि रोजगारनिर्मिती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

तझीन कापडी यांनी प्रास्ताविकातून ‘मिशन ग्रीन गोल्ड’ या संकल्पनेची माहिती दिली. डॉ. अश्विनी नारकर यांनी वाढती वृक्षतोड ही पर्यावरणासाठी गंभीर समस्या असून वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बांबूच्या पानांचे औषधी गुणधर्म स्पष्ट करत, कफ व तापावर त्यांचा उपयोग होत असल्याची माहिती दिली.

कडवईचे पोलिस पाटील संजय ओकटे यांनी संतांच्या अभंगांचा दाखला देत वृक्ष हे आपले पाहुणे असून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत प्रशासक दत्ताराम ओकटे यांनी शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबर पर्यावरण जनजागृती करणारे उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक करून पुढील सहकार्याची ग्वाही दिली.

प्रमुख पाहुणे माजी सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी मी झाड लावणार, मी झाड जगवणार हा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोकणातील पडीक जमिनीवर बांबू लागवड करून पर्यावरण संरक्षणासोबत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती साधता येईल, तसेच कडवईला ‘बांबू गाव’ बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेचे अध्यक्ष सादिक काझी यांनी संकटात संधी शोधण्याची गरज व्यक्त करत, कोकणातील पडीक जमिनीवर बांबू लागवड केल्यास पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. भूतान हा जगातील कार्बन निगेटिव्ह देश असल्याचे उदाहरण देत त्यांनी वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वस्त्रोद्योगासह विविध क्षेत्रांत बांबूचा वाढता वापर लक्षात घेता त्याच्या व्यावसायिक शक्यता मोठ्या असल्याचे सांगितले.

प्रमुख मार्गदर्शक तथा कासारकोळवणचे पोलिस पाटील महेंद्र करंबेळे यांनी बांबूचे विविध प्रकार, लागवडीची पद्धत, आवश्यक काळजी आणि त्यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः लागवड केलेल्या १८०० बांबू बेटांचा अनुभव सांगत माणगा, ग्रीन वल्गारिस, ऑलिव्हेरी, कुल्डा, कळक, मेस व चिवा या जातींची माहिती दिली.

कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे,जमात-ए- मुस्लिमीन कडवईचे अध्यक्ष सिकंदर जुवळे, महाराष्ट्र उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक रिदवान कारीगर, मुश्ताक सावंत, सुबोध कल्याणा, संदेश फडकले, अफसर खान, नौशाद मोडक, मुजीब डावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande