
बीड, 19 जुलै (हिं.स.)। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शांततापूर्ण आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या युवक व विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी बीड येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले असून, आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष कुंदन काळे यांनी दिली आहे.आंदोलनाद्वारे सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात येणार असून, पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.या आंदोलनात युवक, विद्यार्थी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis