
बीड, 19 जुलै (हिं.स.)। नीट (NEET-UG 2026) परीक्षेच्या निकालानंतर संपूर्ण देशभरात गदारोळ माजला असतानाच, आता बीड जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील ज्ञानेश्वरी पवार या गुणवंत विद्यार्थिनीला अधिकृत निकालात ७२० पैकी अवघे ८७ गुण मिळाले आहेत. मात्र, नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (NTA) अधिकृत 'आन्सर की'नुसार तपासणी केली असता, तिला ७०२ गुण मिळायला हवे होते, असा दावा ज्ञानेश्वरी आणि तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना मोठा धक्का बसला असून, 'नीट'च्या निकाल प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
'माझी ओएमआर शीटच बदलली' – ज्ञानेश्वरीचा गंभीर आरोप
ज्ञानेश्वरी पवार हिने दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी मुख्य परीक्षा आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर तिने प्रचंड कष्ट घेतले होते. एनटीएने जारी केलेल्या अधिकृत उत्तरतालिकेशी (Answer Key) पडताळणी केल्यावर तिला ७०२ गुण मिळत होते, ज्यामुळे तिने 'एम्स दिल्ली' (AIIMS Delhi) मध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, प्रत्यक्ष स्कोअरकार्ड हातात आल्यावर तिला फक्त ८७ गुण दिसले. ज्ञानेश्वरीचा असा आरोप आहे की, एनटीएच्या पोर्टलवर तिच्या लॉगिन आयडीमध्ये अपलोड करण्यात आलेली ओएमआर शीट ही तिची मूळ शीट नाहीच, तर ती बदलण्यात आली आहे. ओएमआर शीटच्या बाजूला तिची स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा बरोबर आहे, परंतु आतमधील उत्तरे गोल करण्याची (Filling) पद्धत तिची नाही, असा दावा तिने केला आहे.
मूळ प्रश्नपत्रिका अजूनही सुरक्षित, पालकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा .
ज्ञानेश्वरीचे वडील अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरीने परीक्षेत वापरलेली मूळ प्रश्नपत्रिका अजूनही सुरक्षित आहे. या प्रश्नपत्रिकेवरील उत्तरांवरून स्पष्ट होते की तिला ७०० पेक्षा जास्त गुण मिळायला हवेत. मुलीवर मोठा अन्याय झाला असून, तिचे भविष्य धोक्यात आले आहे.या संदर्भात पवार कुटुंबाने शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन आमची ओरिजिनल ओएमआर शीट द्या आणि वास्तविक गुण जाहीर करा अशी मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास या घोटाळ्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.
बीडमध्ये एकाच वेळी दोन मोठे घोळ
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात केवळ ज्ञानेश्वरीच नाही, तर सोहम गवते नावाच्या आणखी एका विद्यार्थ्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. सोहमला आन्सर कीनुसार ५२२ गुण अपेक्षित असताना, त्याच्या स्कोअरकार्डवर अवघे ९५ गुण दाखवण्यात आले आहेत. बीडमधील या दोन्ही प्रकरणांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis