लातूर : बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही - सहकार मंत्री
लातूर, 19 जुलै (हिं.स.)। आम्ही जिल्हा बँकेच्या कारभारात कधीही पक्षीय राजकारण केले नाही, म्हणूनच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यशस्वी वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. शिरूर ताजबंद येथे लातूर जिल्ह
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील


लातूर, 19 जुलै (हिं.स.)। आम्ही जिल्हा बँकेच्या कारभारात कधीही पक्षीय राजकारण केले नाही, म्हणूनच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यशस्वी वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. शिरूर ताजबंद येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा ना. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव जाधव होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात सोसायटीपासून झाली. एकेकाळी बँकेची स्थिती अत्यंत वाईट होती, मात्र दिलीपराव देशमुख आणि आम्ही मिळून वसुली मेळावे घेतले आणि बँक पुन्हा सुस्थितीत आणली. शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध आहे.

कोविड काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले. भविष्यात बँकेत कोणतीही चुकीची कृती होऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच, दहा गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज देण्याची व्यवस्था करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, शेतकऱ्यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसायाकडे वळून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक

बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तर ज्येष्ठ संचालक अशोकराव गोविंदपूरकर यांनी आपल्या मनोगतातून सहकार मंत्र्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेणारे नेते म्हणून बाबासाहेब पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी नेतेही आज त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत, ही लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, उपनगराध्यक्ष अय्याजभाई शेख, व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर, विविध कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande