
अमरावती, 19 जुलै (हिं.स.)। पावसाने दडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम जोखमीचा झाला आहे. सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने या पिकाची जिल्ह्याची उत्पादन सरासरी घटणार आहे. दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पावसाची सद्यस्थिती व पेरणीचा कालावधी बघता ती अशक्य वाटत असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन सरासरीवर आधारित नुकसानभरपाई द्यावी किंवा ती शक्य नसल्यास मोफत बियाण्यांसोबतच पेरणीचा खर्च द्यावा, अशी मागणी केली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके आहेत. मूग व उडीद आता हद्दपार होऊ लागला असल्याने या तीन पिकांवरच कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थचक्र अवलंबून आहे. गेल्या हंगामात कापूस व सोयाबीनच्या अर्थकारणाचा अनुभव लक्षात घेत शेतकऱ्यांनी यंदा कापसाचे क्षेत्र वाढविले असले तरी सोयाबीनचीही पेरणी त्याखालोखाल झाली आहे. बियाणे उत्पादक कंपन्यांच्या जाहिरातींमुळे हरकून शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत असले तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यावर ठोस उपाययोजना शोधण्यात आलेल्या नाहीत.
दुबार पेरणीचा सोयाबीनचा कालावधी हातचा निघून जात असतानाच पावसाने ओढ दिली असल्याने मोफत बियाणे मिळूनही पेरणी करणे शक्य होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय पेरणीसाठी लागणारा खर्च करायचा कुठून, असाही त्याचा दुसरा प्रश्न आहे. यंदा केंद्राने सोयाबीनला ५ हजार ७०८ रुपये प्रतिक्विंटल दर दिला आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनाची सरासरी एकरी पाच ते सहा क्विंटल आहे. हंगाम हातचा गेल्याने यंदा शेतकऱ्यांचे याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उत्पादन सरासरीवर आधारित भरपाई देण्याची मागणी समोर आली आहे. ही मागणी शक्य नसल्यास किमान पेरणीसाठी येणारा खर्च तरी द्यावा, अशी मागणी समोर आली आहे.
बियाणे बोगस निघाल्याने पहिली पेरणी केलेले क्षेत्र नापेर राहण्याची स्थिती आहे. सोयाबीन आता पेरूनही फार उपयोग होणार नाही. त्याऐवजी तूर पेरण्याचा मार्ग आहे. आता दुबार पेरणीसाठी लागणारा खर्च करायचा कोठून? असा प्रश्न असल्याने पेरणीसाठी लागणारा खर्च सरकारने द्यावा किंवा बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपनीकडून वसूल करून द्यावा. असे शेतकरी संघटनेचे जगदीश बोंडे म्हणाले .
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी