
रायगड, 19 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संदेश कातळकर यांची श्रीवर्धन तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे श्रीवर्धन तालुक्यात मनसेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळण्यासह पक्ष विस्ताराला गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करणे, युवकांना मनसेशी जोडणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्याची जबाबदारी संदेश कातळकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
नियुक्तीनंतर बोलताना संदेश कातळकर यांनी श्रीवर्धन तालुक्यात मनसेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. युवकांना पक्षाच्या विचारांशी जोडणे, गावागावांत संघटना मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या धोरणांचा प्रसार करत नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संदेश कातळकर यांच्या नियुक्तीचे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले. मनसे सैनिक वैभव खैरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे श्रीवर्धन तालुक्यात मनसेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल आणि आगामी स्थानिक पातळीवरील पक्षाच्या उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)