शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पंढरपुरात सद्बुद्धी दिंडी; आ. अमित देशमुख यांचा सहभाग
लातूर, 19 जुलै (हिं.स.)। निसर्ग आणि पर्यावरणाचा नाश करणारा, शेतकरीविरोधी तसेच गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी मिळावी, या मागणीसाठी शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात सद्बुद्धी दिंडी
अमित देशमुख


लातूर, 19 जुलै (हिं.स.)। निसर्ग आणि पर्यावरणाचा नाश करणारा, शेतकरीविरोधी तसेच गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी मिळावी, या मागणीसाठी शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी मान्यवरांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

भर पावसात निघालेल्या या दिंडीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन विनाशकारी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी केली. दिंडीनंतर मंदिर परिसरात जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला सद्बुद्धी मिळावी तसेच शेतकरीहिताचा निर्णय घ्यावा, अशी प्रार्थना श्री पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली.

या सद्बुद्धी दिंडीत माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्यासह शेतकरी नेते जयंत पाटील, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी मंत्री तथा आमदार सतेज (बंटी) पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अभिजित पाटील, आमदार कैलास पाटील यांच्यासह शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.यावेळी उपस्थित नेत्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकून पर्यावरण आणि शेतीला बाधा पोहोचविणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करावा, अशी एकमुखी मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande