
अमरावती, 19 जुलै (हिं.स.) : शिरखेड पोलिसांनी गोराळा येथील पिंगळाई देवी गडाच्या पायथ्याशी वनविभागाच्या दाट जंगलात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर छापा टाकून १० जणांना खेळताना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, सात मोबाईल फोन आणि दोन दुचाकींसह एकूण २ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरखेड पोलिसांना १६ जुलै रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता मुख्य रस्त्यापासून ५०० मीटर आत जंगलात ५२ ताशपत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संशय येऊ नये म्हणून वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करून पायी जंगलात प्रवेश केला. दाट झाडीतून पुढे जात जुगार सुरू असलेल्या ठिकाणाला चारही बाजूंनी घेराव घालून अचानक छापा टाकण्यात आला. यावेळी १० व्यक्ती जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. संशयितांकडून ३४, ८०० रोख, सात मोबाईल फोन (अंदाजे किंमत ७२, ०००) आणि दोन दुचाकी (अंदाजे किंमत १.२० लाख), असा एकूण २.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद इसळ, पोलिस कॉन्स्टेबल पंकज चौधरी, वैभव घोगरे, नीतेश आसोलकर, स्वप्नील डहाके, शेख गणी आणि अतुल मानेकर यांच्या पथकाने केली.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी