
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
नाशिक, 19 जुलै (हिं.स.)। नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शिवसेना पक्षाने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
आज आंदोलनस्थळी शिवसेना पक्षाचे उपनेते तथा नाशिक जिल्हाप्रमुख अजय दादा बोरस्ते आणि उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी भेट देऊन करण गायकर व आंदोलनात सहभागी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.यावेळी शेतकऱ्यांनी रिंग रोड प्रकल्पासंदर्भातील सर्व समस्या,अन्यायकारक भूसंपादन प्रक्रिया, अलाइनमेंटमधील बदल, बाजारभावानुसार योग्य मोबदला,घरे,विहिरी, बोअरवेल,फळबागा आणि शेतीचे होणारे नुकसान याबाबतची माहिती मांडली. या प्रसंगी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदनही देण्यात आले.
यावेळी अजय दादा बोरस्ते आणि विलास अण्णा शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करत सांगितले की,शिवसेना पक्षाच्या वतीने पुढील दोन दिवसांत उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही आंदोलनस्थळी यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्याशी सुद्धा आम्ही फोनवर चर्चा केली चर्चा करूनच आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासित करण्यासाठी आलेलो आहोत की आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही शंभर टक्के शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल.पुढे बोलताना त्यांनी सांगितले कीशिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शिवसेना पक्ष प्रामाणिकपणे त्यांच्या बाजूने उभा राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV