

म्हसळा, १९ जुलै : म्हसळा तालुक्यातील शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी एस. डी. शिंदे कुणबी समाज सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पतसंस्थेचे व्यवस्थापक सुजित पोटले यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद, वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, लेखापरीक्षण अहवाल आणि इतिवृत्त सभासदांसमोर सादर केले. सभेदरम्यान सभासदांनी अधिक कर्जवाटप, चार टक्के लाभांश देणे तसेच संस्थेचा नफा वाढविण्यासाठी विविध सूचना मांडल्या.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन दिलीप कांबळे यांनी स्पर्धात्मक युगातही शिवकृपा पतसंस्था गेली ३४ वर्षे भक्कमपणे कार्यरत असल्याचे सांगितले. संस्थेकडे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी असून सभासदांचा विश्वास, कर्मचारी, व्यवस्थापक आणि स्वल्प बचत प्रतिनिधी यांच्या प्रामाणिक कार्यामुळे संस्थेची सातत्याने प्रगती होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सभासदांना अधिक कर्जवाटप, लाभांश आणि संस्थेची आर्थिक प्रगती यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी व्हाईस चेअरमन शांताराम गिजे, माजी चेअरमन शैलेशकुमार पटेल, संचालक रमेश पोटले, विलास खेडेकर, मंगेश मुंडे, विश्वनाथ विचारे, तुकाराम गिजे, महेंद्र पारेख, अमिता बारटक्के, अनंत येलवे, सविता कानसे यांच्यासह आजी-माजी संचालक, सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी २०२७ मध्ये गुणवंत विद्यार्थी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वल्प बचत प्रतिनिधींचा सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)