

रायगड, 19 जुलै (हिं.स.)। राष्ट्रीय महामार्ग क्र. ९८ ला जोडणाऱ्या दुर्गवाडी–चिराठी गावजोड रस्त्याचे लोकार्पण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ३.४०० किलोमीटर लांबीचा आणि ४.५० कोटी रुपये खर्चाचा सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्ण झाल्याने अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे.
यावेळी ग्रामस्थांनी मंत्री आदिती तटकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्री राधाकृष्ण मूर्ती देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, विकासकामांचे लोकार्पण करताना नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य आणि समाधान हे कोणत्याही सत्कारापेक्षा अधिक मोलाचे असते. या भागातील कायमस्वरूपी पक्क्या रस्त्याची अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
चिराठी गावाचे सुपुत्र तथा म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील शेडगे यांच्या कार्यकाळात गावातील महत्त्वाच्या रस्त्याचे लोकार्पण होणे हा आनंददायी योगायोग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात नगराध्यक्ष सुनील शेडगे यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे आभार मानत, त्यांच्या नेतृत्वामुळे गावाच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेले हे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला समिती सभापती बबन मनवे यांच्या सह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, महिला मंडळ तसेच दुर्गवाडी व चिराठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकारी व अभियंत्यांचाही गौरव करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)