
लातूर, 19 जुलै (हिं.स.) : राज्यभर भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे एका बेकरीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची निर्मिती व मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने संबंधित बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून, व्यवसाय बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
रेणापूर शहरातील गांधी चौक परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बेकरीबाबत अस्वच्छता आणि कालबाह्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे तसेच मुदतबाह्य कच्चा माल वापरला जात असल्याचे उघडकीस आले.
तपासणीदरम्यान विविध कंपन्यांचे व्हाईट कंपाउंड चॉकलेट व ब्रेड पावडर असा एकूण 3 हजार 59 रुपयांचा मुदतबाह्य साठा जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. तसेच मिठाई आणि बेकरी उत्पादनांसाठी वापरण्यात येणारा 10 किलो खवा योग्य तापमानात साठवलेला नसल्याचे निदर्शनास आले. प्रयोगशाळेतील तपासणीसाठी खवा आणि मिल्क टोस्टचे नमुनेही जप्त करण्यात आले आहेत.
अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याने अधिकाऱ्यांनी बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित केला. मात्र, कारवाईनंतरही दुसऱ्याच दिवशी संबंधित दुकानदाराने पुन्हा दुकान सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा नियमबाह्य व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, रेणापूर येथील या कारवाईनंतर लातूर जिल्ह्यातील अनेक बेकरी चालकांनी आपल्या दुकानातील कच्चा माल व उत्पादनांची मुदत तपासण्यास सुरुवात केली असून, अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत अधिक सतर्कता बाळगल्याचे चित्र दिसून येत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis