
अमरावती, 19 जुलै (हिं.स.)| दुचाकीस्वारांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी केले. डोके सुरक्षित तर जीवन सुरक्षित, हा संदेश देण्यासाठी वलगाव पोलिसांनी परतवाडा मार्गावर हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांचे स्वागत केले. पोलिस उपायुक्त सोळंके, पोलिस निरीक्षक रीता उईके यांनी काहींना प्रतीकात्मक स्वरूपात हेल्मेटचे वाटप केले.
शहरात आगामी २४ जुलैपासून हेल्मेट सक्तीचा नियम अधिक कडकपणे लागू करण्यात येईल. त्याकरिता जनजागृती करण्यासाठी वलगाव पोलिसांनी शनिवारी (ता. १८) परतवाडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करून त्यांना सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला. पोलिसांनी वलगाव ठाण्यासमोरच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना अडवले. मात्र, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. जनजागृती मोहिमेमध्ये विभागातील उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक पोलिस आयुक्त दीप्ती ब्राह्मणे, ठाणेदार आणि पीएसआय वाठोरे यांच्या हस्ते हेल्मेट भेट देण्यात आले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी