
बीड, 19 जुलै (हिं.स.) परळी शहरात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या एका मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला (बीएलओ) घरात येऊन फॉर्म न घेतल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकारणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलीकपुरा येथील रहिवासी असलेले महेफूज जाकीर शेख (वय ४२, व्यवसाय शिक्षक) हे नगर परिषदेच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भाग क्रमांक २१२ मध्ये बीएलओ म्हणून कार्यरत आहेत. अब्दुल हमीद शादीखाना येथे आयोजित शासकीय कॅम्पमध्ये ते लोकांचे मतदानाचे फॉर्म भरण्याचे काम करत होते. यावेळी पेठ मोहल्ला येथील शाकेर अहमद शेख, जुनेद शेख, शोएब शेख आणि एका अनोळखी व्यक्तीने तिथे येऊन 'मतदानाचे फॉर्म घेऊन आमच्या घरी का आला नाहीस' अशी विचारणा केली.
त्यानंतर शाकेर अहमद याने शेख यांच्या हातातील शासकीय कागदपत्रे हिसकावून बाजूला फेकून दिली. तसेच उपस्थित सर्वांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत तोंडावर चापटबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यामुळे शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला. तिथे उपस्थित असलेले कर्मचारी शेख जामीन आणि सय्यद हसन यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले.
या घटनेप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम बन्सिधर काळे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis