अमरावती : वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने अंजनगावबारीतील शेतकरी संकटात
अमरावती, 19 जुलै (हिं.स.) | एकीकडे पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अंजनगावबारी परिसरातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. रानडुक्कर, रोहींसह इतर वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेत
शेतातील पिकांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ


अमरावती, 19 जुलै (हिं.स.) | एकीकडे पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अंजनगावबारी परिसरातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. रानडुक्कर, रोहींसह इतर वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेतात घुसून नुकतीच उगवलेले सोयाबीन व पऱ्हाटी अक्षरशः फस्त करीत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अंजनगावबारी परिसरातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. पेरणीसाठी कर्ज काढून किंवा मोठा खर्च करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पिके वाचविण्यासाठी रात्रभर शेतात जागून राखण करावी लागत आहे. तरीही वन्यप्राणी कधीही शेतात घुसून काही मिनिटांत मोठ्या क्षेत्रातील पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच पावसाची अनिश्चितता, वाढलेला उत्पादन खर्च आणि आता वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव, यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. डोंगराळ भागालगतच्या शेतांमध्ये हा उपद्रव अधिक तीव्र असून अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप होत आहे. नुकसानग्रस्त पिकांची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच रानडुक्कर, रोही व इतर वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कधी करणार?, असा संतप्त सवाल अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande