
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । येथील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात करिअर संसदेचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात झाला. करिअर संसदेच्या या नूतन पदाधिकाऱ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन स्तरावर मंत्री मंडळाप्रमाणे विद्यार्थ्यांची करिअर संसद स्थापन करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले की, कोणत्याही यशस्वी नेतृत्वाच्या पाठीशी त्यांनी समाजासाठी निःस्वार्थी भावनेने केलेले काम असते. करिअर संसद हे महाविद्यालय स्तरावर नेतृत्व करण्याची संधी देणारे व्यासपीठ आहे. पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्या महाविद्यालयाकडे सादर कराव्यात. आपल्या वर्तणुकीतून युवकांमध्ये कोणत्याही पद्धतीचे भेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेऊ. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ राहिल, सर्वांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहिल व ते धूम्रपान विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. महाविद्यालयातील चांगल्या बाबींचा समाजमाध्यमांवर प्रचार आणि प्रसार करू. सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या संदेशाचे प्रसारण करणार नाही, अशी शपथ घेण्यात आली.
यावेळी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे यांच्यासह आदी उपस्थित होते. करिअर संसदेच्या मुख्यमंत्रिपदी वेदश्री फडके, नियोजन मंत्री मेघना किंजळे, कायदे व शिस्त पालन मंत्री त्रिवेणी देसाई, सामान्य प्रशासन मंत्री शरा वागळे, माहिती व प्रसारण मंत्री झोया काझी, उद्योजकता विकास मंत्री नूतन निंबरे, रोजगार-स्वयं रोजगार मंत्री तन्वी आडविलकर, कौशल्य विकास मंत्री करीना राणे, संसदीय कामकाज मंत्री पार्थ जाधव, महिला व बालकल्याण मंत्री इकरा फणसोपकर आणि सदस्य म्हणून लौकिक उबाळे यांची निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी