अन्न व औषध प्रशासनाची पुण्यात कारवाई; 10 रक्तपेढ्या आणि 6 रक्तसाठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित
पुणे, 19 जुलै (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाने (FDA) रक्तपेढ्या आणि रक्तसाठवणूक केंद्रांमधील नियमांचे पालन तपासण्यासाठी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते जून 2026 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील 10 रक्तपेढ्या आणि 6 रक्तसाठवणूक केंद्रांव
fda


पुणे, 19 जुलै (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाने (FDA) रक्तपेढ्या आणि रक्तसाठवणूक केंद्रांमधील नियमांचे पालन तपासण्यासाठी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते जून 2026 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील 10 रक्तपेढ्या आणि 6 रक्तसाठवणूक केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून, गंभीर नियमभंग आढळल्याने त्यांच्या परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभरातही या तीन महिन्यांत 23 रक्तपेढ्या आणि 15 रक्तसाठवणूक केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 21 रक्तपेढ्या आणि 13 रक्तसाठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित, तर 2 रक्तपेढ्या आणि 2 रक्तसाठवणूक केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्तकेंद्राच्या तपासणीत मंजूर तांत्रिक पर्यवेक्षक नसतानाही रक्तघटक तयार केले जात असल्याचे आढळले. तसेच रक्ताच्या नोंदी अपूर्ण होत्या, प्लेटलेट्सच्या नमुन्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली नव्हती, काही रक्तपिशव्यांवर अनिवार्य माहिती नमूद नव्हती आणि उपकरणांच्या निर्जंतुकीकरणावेळी तापमानाची नोंद ठेवली जात नव्हती. या गंभीर त्रुटींमुळे संबंधित रक्तकेंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला.

याशिवाय देहूरोड येथील विमल चॅरिटेबल ट्रस्ट, मंगळवार पेठेतील कै. मधुकर सखाराम बीडकर रक्तकेंद्र, रास्ता पेठेतील पूना सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट आणि शिरूर येथील ओम रक्तकेंद्र यांच्या परवान्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

रक्तसाठवणूक केंद्रांमध्ये विश्रांतवाडी येथील विनोद मेमोरियल हॉस्पिटल, लोहगाव येथील साई श्रद्धा रक्तसाठवणूक केंद्र, उरुळी कांचन येथील श्री सिद्धिविनायक क्रिटिकेअर, बोरी पारधी (दौंड) येथील निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर, बारव (जुन्नर) येथील यशवंतराव चव्हाण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शिवाजीनगर येथील प्रथमा रक्तसाठवणूक केंद्र यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच बोरी पारधी (ता. दौंड) येथील पाटील हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटरचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून, रक्तसंकलन व साठवणुकीच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश FDAने या कारवाईतून दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande