
सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। श्री गजानन महाराज पालखी सोहळा 2026 अंतर्गत सोमवार, 20 जुलै रोजी श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरातून मोठ्या भक्तिभावात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मात्र, शहरातील रेल्वे पुलाचे काम सुरू असल्यामुळे यंदा पालखीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेने दिली आहे.
महानगरपालिकेच्या नियोजनानुसार पालखी मिरवणुकीची सुरुवात उपलब्ध मंगल कार्यालय येथून होईल. त्यानंतर मिरवणूक मोदी पोलीस चौकी, रेल्वे डीआरएम कार्यालय, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक, रामलाल चौक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे चौक (भैया चौक) मार्गे पुढे जाईल.
रेल्वे पुलाच्या कामामुळे पुढील मार्गात बदल करण्यात आला असून पालखी रेल्वे स्टेशन, मोदी पोलीस चौकी रेल्वे बीज, रामवाडी दवाखाना, नागनाथ मंदिर, लक्ष्मी-विष्णू चाळ आणि मरिआई चौक मार्गे दामाणी नगर येथे सकाळी सुमारे 11 वाजता पोहोचणार आहे.
दामाणी नगर येथे वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला रवाना होणार आहे.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या मार्गाची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे. तसेच पालखी मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड