
पुणे, 19 जुलै (हिं.स.)। कोरेगाव पार्क परिसरात तीन विधिसंघर्षित बालकांनी निवारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर कर्मचाऱ्यांशी झटापट करून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली असून, दोन बालकांना ताब्यात घेण्यात यश आले आहे, तर तिसऱ्या बालकाचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल कल्याण समिती क्रमांक 2 यांच्या आदेशानुसार तीन 17 वर्षीय विधिसंघर्षित बालकांना शासकीय बारामती निरीक्षणगृहात दाखल करण्यासाठी खासगी वाहनातून नेण्यात आले होते. मात्र, संबंधित संस्थेने या बालकांना स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांना पुन्हा पुण्यातील 'साथी खुले निवारागृह' येथे आणण्यात आले. निवारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनातून खाली उतरवत असताना तिन्ही बालकांनी अचानक कर्मचाऱ्यांशी वाद घालत झटापट केली आणि त्यांच्या तावडीतून सुटका करून घटनास्थळावरून पळ काढला. घटना घडताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. त्यातील एका बालकाला घटनास्थळाजवळच पकडण्यात यश आले, तर दुसरा बालक चिंचवडच्या दिशेने पळून गेला होता. कोरेगाव पार्क पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने चिंचवड परिसरातून त्यालाही ताब्यात घेतले. सध्या तिसऱ्या फरार बालकाचा शोध सुरू असून, कोरेगाव पार्क पोलीस पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु