
पुणे, 19 जुलै (हिं.स.)पुणे परिमंडलात वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने राबविलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या 15 दिवसांत 1,281 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लाख 40 हजार 730 युनिट वीजचोरी उघडकीस आली असून, संबंधितांकडून 81 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम, 2003 अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महावितरणने दिला आहे.
महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांच्या निर्देशानुसार मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या नेतृत्वाखाली 1 ते 16 जुलैदरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मीटरमध्ये फेरफार करणे, थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणे तसेच विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरुद्ध या मोहिमेत कठोर कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान रास्तापेठ विभागात सर्वाधिक 375 प्रकरणे आढळून आली. येथे 90 हजार 799 युनिट वीजचोरी उघडकीस आली असून, संबंधितांवर 23.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण भागात 580 वीजचोरांवर कारवाई करत 1 लाख 36 हजार 930 युनिट वीजचोरी उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये 29.82 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.तर गणेशखिंड विभागात 326 प्रकरणांमध्ये 1 लाख 13 हजार 1 युनिट वीजचोरी उघड झाली असून, संबंधितांवर 28.42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.महावितरणने नागरिकांना अधिकृत वीजजोडणीचा वापर करण्याचे आवाहन करत वीजचोरीची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याचेही आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु