
पुणे, 19 जुलै (हिं.स.)पुणे महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उच्च क्षमता द्रुतगती वाहतूक मार्ग (HCMTR) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अंतर्गत रिंग रोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन प्रस्ताव पुढील 20 दिवसांत सादर करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राज्य शासनाने HCMTR, अंतर्गत रिंग रोड आणि बोगदा प्रकल्पांसाठी स्थापन केलेल्या कार्यकारी समितीची पहिली बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर व ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे तसेच PMRDAचे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते. बैठकीत भूसंपादन, सुधारित आराखडा आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. HCMTR प्रकल्पाचा आढावा घेताना आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, सुधारित आराखड्यात प्रस्तावित मार्गात 12 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे भूसंपादनातील अडथळे कमी होण्यास मदत होणार असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिक वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु