पुणे महापालिकेची 35.44 कोटींची भाडे थकबाकी; स्वतःची वसुली करण्यात प्रशासन अपयशी
पुणे, 19 जुलै (हिं.स.)। सामान्य नागरिकांकडून मिळकतकर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर कारवाई करणाऱ्या पुणे महानगरपालिकेला मात्र स्वतःच्या मालमत्तांचे भाडे वसूल करण्यात मोठे अपयश आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मालकीच्या सदनिका, इमारत
pmc


पुणे, 19 जुलै (हिं.स.)। सामान्य नागरिकांकडून मिळकतकर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर कारवाई करणाऱ्या पुणे महानगरपालिकेला मात्र स्वतःच्या मालमत्तांचे भाडे वसूल करण्यात मोठे अपयश आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मालकीच्या सदनिका, इमारती आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी तब्बल 35 कोटी 44 लाख 28 हजार 610 रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

महापालिकेच्या मोक्याच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न मिळविणाऱ्या अनेक भाडेकरूंनी वर्षानुवर्षे भाडे न भरल्यामुळे ही थकबाकी वाढली आहे. मात्र, संबंधित थकबाकीदारांविरोधात प्रभावी कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक देवेंद्र वडके यांनी मालमत्ता विभागाच्या कामकाजाबाबत आणि थकीत भाड्याविषयी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला प्रशासनाने दिलेल्या अधिकृत उत्तरातून ही बाब समोर आली.

प्रशासनाच्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या मालकीच्या 1,132 सदनिका, 263 इमारती (भवने) आणि 1,552 मोकळ्या जागा आहेत. या मालमत्तांचे भाडे वेळेत वसूल न झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, कोट्यवधी रुपयांची थकबाकी अद्याप वसूल झालेली नाही. या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांवर कठोर कारवाई करून महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande