उच्च सुरक्षा क्रमांक पाटी नसल्यास दंड अटळ
पुणे, 19 जुलै (हिं.स.)। उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याची मुदत संपल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. मुदत संपल्यानंतरच्या पहिल्या 15 दिवसांत, म्हणजेच 1 ते 15 जुलैदरम
HSRP


पुणे, 19 जुलै (हिं.स.)। उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याची मुदत संपल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. मुदत संपल्यानंतरच्या पहिल्या 15 दिवसांत, म्हणजेच 1 ते 15 जुलैदरम्यान, HSRP नसलेल्या 2,684 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाकडून HSRP नसलेल्या वाहनांची तपासणी करून मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड आकारला जात आहे. याशिवाय HSRP नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, कर्जबोजा नोंदविणे किंवा कमी करणे, पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवान्याचे नूतनीकरण यांसारख्या सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.

तथापि, 30 जूनपूर्वी HSRP बसविण्यासाठी अर्ज केलेल्या वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात येणार नाही, असे प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे विभागात आतापर्यंत 9 लाख 56 हजार 347 वाहनांवर HSRP बसविण्यात आली आहे. तर 11 लाख 69 हजार 23 वाहनधारकांनी अर्ज केला असून, त्यापैकी 11 लाख 63 हजार 333 जणांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 24 लाख 28 हजार वाहनांना HSRP बसविणे बंधनकारक आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांसाठी HSRP अनिवार्य असून, त्यानंतर नोंदणी झालेल्या नव्या वाहनांमध्ये HSRP क्रमांक पाटी आधीपासूनच बसवूनच ती रस्त्यावर आणली जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande