
सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी धर्मपुरी येथे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामविकास विभाग व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पादुकांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा प्रशासनाने पालखी रथावर पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले.
पालखी धर्मपुरीत दाखल होताच 'ज्ञानोबा माऊली, तुकाराम' आणि **'राम कृष्ण हरी'**च्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पोलीस बँड पथकाने भक्तिमय धून सादर करून स्वागत सोहळ्याला वेगळीच रंगत आणली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही अंतर पालखीसोबत पायी चालत वारकऱ्यांमध्ये सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
या स्वागत सोहळ्यास आमदार उत्तम जानकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ तसेच दोन्ही जिल्ह्यांतील विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि हजारो वारकरी उपस्थित होते.
धर्मपुरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधांची प्रभावी व्यवस्था केली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, वीजपुरवठा, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात असून, जिल्हा परिषदेने हिरकणी कक्ष सुरू केला आहे. याशिवाय भाविकांच्या पायांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीन उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा हजारो वारकरी लाभ घेत आहेत. तसेच आपत्कालीन आरोग्यसेवेसाठी आरोग्य दूत आणि आरोग्य बाईक तैनात करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड