
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । रत्नागिरीचा सुपुत्र भावेश सुरेश चव्हाण याने नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत एसटी प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम, तर देशात चौथा क्रमांक मिळविला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत भावेशने ७२० पैकी ६६६ गुण मिळवत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
नीट-यूजी २०२६ चा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. सध्या लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या भावेशने मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविले.
भावेशची आई सुरेखा सुरेश चव्हाण या विद्युत निरीक्षक असून, त्यांची सध्या मुंबई येथे बदली झाली आहे. वडील सुरेश चव्हाण रत्नागिरीत पत्रकार आहेत. मूळ नाशिकचे असलेले चव्हाण कुटुंब गेल्या १५ वर्षांपासून रत्नागिरीत वास्तव्यास आहे.
भावेशचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतील माने इंटरनॅशनल स्कूलमध्ये, तर सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. दहावीच्या परीक्षेतही त्याने प्रथम क्रमांक मिळविला होता.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून भावेशने अकरावीनंतर नीट परीक्षेच्या तयारीसाठी लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या प्रवेशपरीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याची निवड झाली होती. नियोजनबद्ध अभ्यास, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर त्याने हे यश मिळविले.
भावेशच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी