
सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील एनटीपीसी परिसरातील एका कंपनीच्या कार्यालयात 43 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृताची ओळख सुनील चनबसप्पा कोठाणे (वय 43, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) अशी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असून, घटनेची नोंद केली आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. त्या चिठ्ठीत कर्जबाजारीपणा आणि कंपनीतील काही अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.
वळसंग पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड