
पुणे, 19 जुलै (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेला वेग आला असून, कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणाऱ्या 133 पदांसाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. अर्ज केलेले उमेदवार विद्यापीठाच्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन आपले नाव तपासू शकतात. विद्यापीठातील विविध विभागांतील रिक्त पदांसाठी आठ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांची नियमित भरतीही लवकरच सुरू होणार आहे. मात्र, त्या प्रक्रियेस आणखी काही महिने लागण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंत्राटी भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करून शुक्रवारी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराचा एपीआय/एटीआर (ATR) विचारात घेऊन गुणांकन करण्यात आले असून, त्यानुसार ही गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.
विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांना अधिकृत भरती संकेतस्थळावरून आपली माहिती तपासण्याचे आवाहन केले असून, पुढील प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु